राष्ट्रवादीने केला पिंपरीत राज्य सरकारचा निषेध
पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आमदार रोहित पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे कारखाने ७२ तासात बंद करणे बाबत जी नोटीस बजावली आहे ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने, पवार कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी केली असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला आहे.
यावेळी तुषार कामठे म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील नद्या प्रदूषण करणाऱ्या किती कारखान्यांवर अशा प्रकारे नोटीशा बजावल्या आणि काय कारवाई केली याचा लेखाजोखा सादर करावा. तसेच राज्यातील किती कारखान्यांवर अशा प्रकारची कारवाई यापूर्वी केली असल्याचे नागरिकांपुढे जाहीर करावे. अशा नोटिशीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि पेटून उठलेला युवक भिक घालणार नाही. आमदार रोहित पवार यांना बजावलेल्या या नोटीसीचे उत्तर आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत नागरिक नक्कीच देतील असेही तुषार कामठे यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले.
आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यरात्री दोन वाजता त्यांचे कारखाने पुढील ७२ तासात बंद करण्याबाबत नोटीस बजावली आहे. या नोटीस म्हणजे राज्य सरकारने केलेले सुडबुद्धीचे राजकारण आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गत वतीने शुक्रवारी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका सुरक्षणा शीलवंत – धर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजन नायर, सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बरसागडे, प्रदेश सचिव के. डी. वाघमारे, शहर प्रवक्ता माधव पाटील, वाहतूक संघटनेचे शहराध्यक्ष काशिनाथ जगताप, विद्यार्थी संघटना शहराध्यक्ष राहुल आहेर, संजीवनी पुराणिक, जयंत शिंदे, संदीप पाटील, सुहास देशमुख, रोहित जाधव, राजू चांदणे, अतुल भोसले, योगेश सोनवणे, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका सुरक्षा शीलवंत – धर यांनी सांगितले की, आमदार रोहित पवार यांनी विविध प्रश्न राज्य सरकारला विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे देणे राज्य सरकारला शक्य नाही. त्यामुळे आ. रोहित पवार यांना आणि अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सूडबुद्धीने त्रास देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मध्यरात्री दोन वाजता नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने एवढी कार्य तत्परता जर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखवली असती तर बरे झाले असते. या नोटिसांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज दाबता येणार नाही, तर उलट जास्त तीव्रतेने आम्ही आता रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध करू असे माजी नगरसेविका सुरक्षणा शीलवंत – धर यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले.
ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे निषेध व्यक्त करताना म्हणाले की, आ. रोहित पवार यांनी युवकांना रोजगार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुरू केलेल्या कारखान्यांमध्ये हजारो युवक नोकरी करतात. हे कारखाने बंद झाल्यामुळे हजारो युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. राज्य सरकारने केलेले हे सूडबुद्धीचे राजकारण राज्य सरकारवरच उलटणार आहे. सरकारने या नोटीसी मागे घ्याव्यात अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनानंतर गणपतीची आरती करून राज्य सरकारला सद्गबुध्दी द्यावी असे साकडे गणरायाला घालण्यात आले आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.