गुप्तधन काढून देतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा

तीन भोंदू बाबांना खेड पोलिसांनी अवघ्या तीन तासात ठोकल्या बेड्या

खेड I झुंज न्यूज : राहत्या घरात असलेले गुप्तधन तांत्रिक पूजापाठ, होमहवन करून काढून देतो, अशी बतावणी करून ४० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार भरणे (ता. खेड) येथे घडला. या प्रकरणी साताऱ्यातील भोंदूबाबा आणि त्याच्या दोन साथीदारांना खेड पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील गिरेवाडी व करंजवडे येथून अटक केली आहे. या तिघांना खेड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला असून, प्रसाद हरीभाऊ जाधव (४७, रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), विवेक यशवंत कदम (४८, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) व ओंकार विकास कदम (२३, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत . याप्रकरणी भरणे येथील महिलेने फिर्याद दिली.

या महिलेला मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये एका गरीब व कष्टकरी महिलेला विश्वासात घेत भोंदूबाबांनी घरातील गुप्तधन काढून देतो आणि कोट्यवधी रुपये मिळवून देतो, असे सांगून ४० लाख ९० लाखाला लुबाडले. या फसवणूकप्रकरणी महिलेने खेड पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (१), २ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता.

खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी तीनही भोंदूबाबांना शोधण्याकरिता तपासाची चक्रे फिरवली. खेड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पाेलिस काॅन्स्टेबल राहुल कोरे, रूपेश जोगी यांच्या सहकार्याने या तिघांनाही गिरेवाडी व करंजवडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.

“रत्नागिरी मधील नागरिकांनी अश्या प्रकारच्या भोंदू बाबांवर विश्वास ठेऊ नये व अश्या प्रकाराला बळी पडू नये तसेच आपली आयुष्याची कमाई ही चांगल्या मार्गी लावण्यास सदैव प्रयत्नशील राहावे. आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडताना दिसल्यास लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा.
– धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *