मासे खाल्ले की बाईमाणूस चिकनी दिसतात, कोणी बघितलं तरी पटवणार ! ; कॅबिनेट मंत्र्यांची जीभ घसरली…

धुळे I झुंज न्यूज : महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आमदारांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला धमकावले होते, तर आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला हात पाय तोडण्याची धमकी दिली होती. आता कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महिलांवर विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास खाते देण्याते आले. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी दररोज मासे झाल्ल्यामुळे ऐश्वर्या राय हिचे डोळे सुंदर झाल्याचे म्हटले.

मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की माणूस म्हणजे बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळे तरतरीत होतात. कोणीही बघितले तरी पटवूनच घेणार, असे गावित म्हणाले. पुढे त्यांनी उपस्थितांना विचारले की, कोणी ऐश्वर्या राय बघितली काय? काय रे सांगितले की नाही ऐश्वर्या राय. ती समुद्राच्या किनारी, बंगळुरुची राहणारी. ती दररोज मासे खायची. दररोज मासे खाल्ल्यामुळेच तिचे डोळे सुंदर आहेत. तुमचेही तसेच होणार.

आणखी एक फायदा म्हणजे आपली जी त्वचा असते ती मासे खाल्ल्यामुळे चांगली दिसते. माशांमध्ये एक प्रकारचे तेल असते, त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि माशाच्या तेलामुळे शरिराची त्वचाही चांगली दिसते, असेही गावित म्हणाले.

दरम्यान, डॉ. विजयकुमार गावित यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते नंदरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास खाते कारभार आहे.

            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *