कौतुकास्पद ! महापालिका शाळेतील १० विद्यार्थी थेट जर्मनी दौऱ्यावर…

या विद्यार्थ्यांचा आम्हा कासारवाडीकरांना अभिमान ; मा. नगरसेवक शाम लांडे यांच्याकडून कौतुक

पिंपरी I झुंज न्यूज : संयुक्त राष्ट्रांने गेम चेंजमेकर या उपक्रमांतर्गत जगातील सहा देशांना वेगवेगळे विषय दिले होते. भारताला स्वच्छ पाणी आणि स्वच्छता हा प्रकल्प दिला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील शाळेतील विद्यार्थी SDG 6 -स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यावर काम करत होते. शाळेच्या या प्रोजेक्टची जर्मनीतील हेलब्रॉन मध्ये पाणी, स्वच्छता यावर आयोजित परिषदेसाठी गेल्यावर्षी निवड झाली. भारतातून महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड झाल्याने ही शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दि. 15 जुलै रोजी सायंकाळी शाळेतील दहा विद्यार्थी आणि दोन शिक्षक जर्मनीकडे रवाना झाले. यामध्ये ताहुरा मणियार, श्रावणी टोनेज, गौरव पवार, क्षितीज गुजर,ईशा पाटील,ताहुरा शेख, सई लांडगे, अथर्व भाईप, आयेशा मुस्तफा, प्रथमेश जाधव हे विद्यार्थी असून त्यांच्यासोबत शिक्षिका फ्लोरिना फिलिप्स आणि शिक्षिका गायत्री आहेत.

यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेत या विद्यार्थ्यांचे भाषण, वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. नामवंत व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. जगातील सहा देशातील विद्यार्थी परिषदेत सहभागी असणार आहेत. जर्मनीला जाण्यासाठी हे विद्यार्थी कासारवाडीतून मुंबई विमानतळावर दाखल झाले तेथून सर्व विद्यार्थी व शिक्षिका दुबई कडे रवाना झाले आहेत, दुबई मध्ये विमान बदलून तेथून जर्मनीकडे कूच करणार आहेत.

हा अभ्यास दौरा 25 जुलै 2023 पर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांचा जर्मनीला जाण्याचा संपूर्ण खर्च आकांक्षा फाऊंडेशन सीएसआर फंडातून करत आहे. यावेळी उपस्थित पालक शिक्षक तसेच माजी नगरसेवक शाम अण्णा लांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्याम लांडे म्हणाले, अभ्यास, कष्टाच्या जोरावर महापालिका शाळेत शिकणारी कासारवाडीतील गोरगरिबांची मुले अभ्यास दौ-यासाठी परदेशात चालली आहेत. गोरगरिबांची मुले जर्मनीला चालल्याने आनंद होत आहे. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सहा महिन्यापासून सुरू होती. अनेक अडचणी येत होत्या. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचाही पासपोर्ट लागत होता. काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे. अनेक अडचणींवर मात करत सर्व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढला.

“अखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थी आज जर्मनीला जात आहेत. विमानात कसे बसायचे, काय काळजी घ्यायची, साहित्य कुठे तपासले जाते याची रंगीत तालीम घेतली आहे. कासारवाडीतील गोरगरिबांच्या मुलांना अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात पाठविण्यास मदत करू शकलो याचा मला आनंद आहे. महापालिका शाळेतील या विद्यार्थ्यांचा आम्हा कासारवाडीकरांना अभिमान आहे.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *