पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे गडकरींनी केले कौतुक !
पिंपरी I झुंज न्यूज : देशातील रस्ते विकासात मागील नऊ – दहा वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. रस्ते आणि महामार्गांची बांधणी करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे उभारून भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी रस्ते विकासामधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पेटंट मिळालेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खा. दिग्विजय सिंह यांच्यासमोर केले. या मध्ये रस्ते सुरक्षा ऑडिट, वाहतूक नियोजन, प्रवास मागणी अंदाज, स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, पर्यावरण ऑडिट, डिझाइन आणि ट्रॅफिक बेटाचा विकास, फुटपाथ परफॉर्मन्स इंडेक्स, ब्लॅक स्पॉट आयडेंटिफिकेशन अशा वाहतुकीच्या आवश्यक विषयांवरील प्रकल्पांचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थेवर सखोल अभ्यास करून प्रकल्प मांडले आहेत, यावर गडकरी यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पांमधील काही विशेष प्रकल्प – पार्किंग सेंसर्स प्रोजेक्ट – हा प्रकल्प वापरकर्त्याला रिक्त पार्किंग स्लॉट स्वयंचलितपणे ओळखण्यास मदत करतो. यात अँड्रॉइड ॲप आणि पार्किंग स्लॉटवर आयओटी सेन्सर बसवलेले असतील. प्रत्येक पार्किंग स्लॉटवर सेन्सर बसवले जातील. त्यानुसार रिकामे पार्किंग स्लॉट त्याच्या अंतरासह वापरकर्त्यास, ड्रायव्हरला अँड्रॉइड ॲपवर सूचित केले जाते. वापरकर्ता, ड्रायव्हर स्लॉट निवडेल आणि नंतर ॲप त्याला नकाशाद्वारे पार्किंग स्लॉटच्या स्थानावर निर्देशित करेल.
पवना नदी पाणी गुणवत्ता मूल्यांकन – पवना नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन हा प्रकल्प जलदिंडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केला गेला. पवना नदीच्या १८ किमी पट्ट्यातून सुमारे ३० नमुने गोळा करून पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले गेले. यामध्ये असे आढळून आले की ८० टक्के नमुने अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त आहेत. ही आकडेवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्या उपस्थितीत महापालिकेला सादर करण्यात आली.
प्रकल्पांना मिळालेली बक्षिसे आणि अनुदान –
थ्री डी प्रिंटिंग तंत्राचा विकास – अठरा लाख २५ हजार, ऑटोमेटेड लेआउट मार्किंग वाहन – सव्वा तीन लाख, ला फाऊंडेशन डसाॅल्ट सिस्टीम पुणे यांच्याकडून एकूण निधी एकवीस लाख पन्नास हजार, सिरो निधी – थ्री डी प्रिंटिंग तंत्र – पाच लाख,
पीसीईटीने ‘अॅडव्हान्स थ्री डी प्रिंटिंग लॅबोरेटरी’ उभारणीसाठी सोळा लाखांचे अनुदान दिले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक –
यातील बहुतांश प्रकल्पांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध बक्षिसे मिळाली आहे; तर काही प्रकल्पांना बहुराष्ट्रीय कंपनी कडून संशोधन अनुदान देखील मिळाले आहे. तसेच पीसीसीओईने शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या ‘फिटनेस फर्स्ट’ फेस्टिवल वर्ष २०२३-२४ या नामफलकाचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘फिटनेस फस्ट’ हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येत आहे. यामध्ये योग, झुम्बा डान्स, खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी आवर्जून उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार उमाताई खापरे, अश्विनी जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, अंकिता हर्षवर्धन पाटील, नारायण बहिरवाडे, राजू दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गिरीश देसाई प्रास्ताविकात म्हणाले, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना १९९० मध्ये माजी आमदार स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सुरुवातीला पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाची स्थापना झाली. गेल्या ३२ वर्षांत ऑर्किटेक्चर, व्यवस्थापन शास्त्र, अभियांत्रिकी आदी विद्याशाखा सुरू करण्यात आल्या. संस्थेमध्ये केजी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे.
आज देश विदेशात संस्थेचा गौरव होत असून प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंती पीसीसीओई महाविद्यालयास मिळत आहे. नुकतेच संस्थेने पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) हे स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले असून त्यात व्यवस्थापन शास्त्र, औषध निर्माण, कला, वाणिज्य, संगणक शास्त्र, अभियांत्रिकी आदी विविध विषयांवर उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाचे कुलपती म्हणून संस्थेचे विश्वस्त, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. स्वागत व आभार डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मानले.