लेखन : एस. एम. देशमुख
(मुख्य विश्वस्थ मराठी पत्रकार परिषद)
आश्वासनं देताना ती पूर्ण केलीच पाहिजेत असं बंधन पुढाऱ्यांवर नसल्यानं वारेमाप आश्वासनं दिली जातात.. बरं ही आश्वासनं देताना तारतम्य बाळगण्याची गरजही पुढाऱ्यांना वाटत नाही..
कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्यात.. म्हणजे आता तिथं आश्वासनाची बरसात होणार..त्याला सुरूवातही झालीय.. कर्नाटकातला जेडीएस हा पक्ष स्वत:ला शेतकरयांचा पक्ष समजतो.. एचडी कुमारस्वामी हे या पक्षाचे नेते आहेत.. एका सभेत बोलताना त्यांनी “आपला पक्ष सत्तेवर आला तर” शेतकरयांच्या मुलाशी लग्न करणारया मुलीला सरकार प्रोत्साहनपर दोन लाख रूपये देईल” अशी घोषणा केलीय..
मुद्दा दोन लाख रूपये देण्याचा नाहीच.. प्रश्न मुली शेतकरयांच्या मुलाशी लग्न का करीत नाहीत हा आहे ? ही मुलं बिनकामाची, ऐतखाऊ असतात? नालायक असतात? यापैकी काहीही नसते..
शेतकरयांची दैन्यवस्था हे एकमेव त्याचं कारणय…या दारिद्र्यात खितपत पडायला मुली तयार नसतात.. शेतकऱ्यांची ही अवस्था कोणी केली? एक निसर्ग आणि दुसरे सरकारी धोरणं..हे त्याचं उत्तर !
या दोन गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या करतात.. कायम दारिद्र्यात खितपत पडतात..यामुळेच शेतकरी कर्जात जन्मतो, कर्ज डोक्यावर घेऊनच जगतो आणि कर्जातच मरतो असं म्हटलं जातं..
शेतकरयाचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा तर होते पण दुप्पट राहू द्या.. आज शेतीतून लागतमूल्य देखील निघत नाही…. त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज कोणत्याच सरकारला वाटत नाही.. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाले, खते, बी – बियाणे रास्त भावात मिळाली, सिंचन व्यवस्था झाल्या, वीज वेळेवर आणि पुरेशी मिळाली तर बळीराजाला आणखी काय हवंय.. तो सुखी-संपन्न होईल.. अन मग शेतकऱ्याचा मुलगा पती म्हणून नको असं कोणतीही मुलगी म्हणणार नाही.. परंतू कोणत्याच पुढाऱ्याला हे होऊ द्यायचं नाही..
मुळ दुखणयाकडं हेतुत: दुर्लक्ष करायचे आणि शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न केल्यास दोन लाख रूपये देण्याच्या वरवरच्या मलमपट्टया करायच्या.. ही दिशाभूल झाली.. कुमारस्वामी छाप अशा फसव्या घोषणांपासून सावध राहिले पाहिजे..!