नाशिक I झुंज न्यूज : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रात्रंदिवस कष्ट करूनही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. आंदोलने करूनही सरकार लक्ष देत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व कर्जफेडीसाठी देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढले आहे.
मौजे माळवाडी येथील ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाला निषेधार्थ ‘गाव विकणे आहे’ असा फलक ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला आहे. ग्रामस्थांनी राज्य सरकारला गांव विकत घेण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत गाव विक्रीसंदर्भात ठराव केला असून शासनाकडे गांव विक्रीबाबतचा ठराव पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या फलकाची जोरदार चर्चा असून फलकाने खळबळ उडवून दिली आहे.
गावची लोकसंख्या २ हजार असून साडेपाचशे हेक्टर शेती आहे. ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. गावकऱ्यांनी वर्षभर राब राब राबायचे. उत्पन्न काढायचे आणि ते मातीमोल भावात विकायचे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. आत्महत्या करण्यापेक्षा गांव विकून, किंवा बाहेरगावी जाऊन व्यवसाय करून सुखाने जीवन जगता येईल ही ग्रामस्थांनी भूमिका मांडली आहे. आमच्या गावावर जी वेळ आली आहे ती इतर शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यावा अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी केली आहे.