पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक केसरीचे पिंपरी चिंचवडचे आवृत्ती प्रमुख विजय भोसले (वय ६६) यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले हे हे मागील ४१ वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात लाखो नियमित वाचक होते. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
मराठी पत्रकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यासाठी ते एक चालते बोलते व्यासपीठ समजले जायचे. आजही प्रसारमध्यमातील अनेक पत्रकार त्यांचे मार्गदर्शन घेत होते. विजय भोसले यांचे मुंबई अधिवेशन, नागपूर अधिवेशन वार्तांकन महाराष्ट्रात मोठ्या आवडीने वाचले जायचे.
भोसले यांनी एलआयसीच्या आयपीओ बाबत केलेले वृत्तांकन लाखो लोकांनी वाचले. तसेच मंत्रालय, विधिमंडळ प्रतिनिधी म्हणून ते गेली ३२ वर्षे नियमित काम करीत होते. शहरातील, राज्यातील राजकारण, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा सखोल अभ्यास होता तर त्या विरोधी त्यांनी केलेले लिखाण राज्यभर गाजले आहे.
#ZunjNews