शब्दांकन :
– श्री. सुगंधराव पर्वतराव उमाप ,
– अध्यक्ष, श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान,जातेगाव बुद्रुक ता. शिरूर
“आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीने जनतेचे अफाट नेटवर्क, शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचा संपर्क, चिंतनशील वृत्ती, याव्दारे माननीय साहेबांनी विविध खात्यांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. सेवेतील 22 वर्षे मुंबई, 4 वर्षे कोल्हापूर, 7 वर्षे पुणे, 1 वर्ष नाशिक, 3 वर्ष सांगली, अशी एकूण 36 वर्षे 5 महिने सेवा म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर आढावा होय.स्वकर्तृत्वाने प्रशासनात आपले स्थान निर्माण करणारे उमाप साहेब व्यवस्थापनात मजबूत पकड ठेवणारे यशस्वी अधिकारी आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीद्वारे जाणवतो.
………………………………………..
श्रीमान कांतीलाल बाबूराव उमाप, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य हे दिनांक 30 नोव्हेंबर 2022 नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. श्री. उमाप साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यमापन शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. तथापि, त्यांच्याविषयीची आस्था आणि कृतज्ञता व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अतिशय जवळून अनुभव यानिमित्ताने सादर करीत आहे.
उमाप साहेबांचे आजोबा भागुजी अनाजी उमाप व आमचे आजोबा बापूसाहेब उमाजी उमाप जुन्या पिढीतील बांधभाऊ, सेवाभावी विचार आणि गावकारभारात सक्रिय असणारी जाणती मंडळी होत. दुष्काळाच्या झळा व सुकलेले मळे, यांवर मात करीत साहेबांचे वडील बाबुराव उमाप व आई राणूबाई उमाप यांनी कष्टप्रद परिस्थितीवर मात करीत पाचही मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणेकामी अथक परिश्रम घेतले.
उमाप साहेब लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता व कामाप्रती एकाग्रता, असे संयमी स्वभावाचे, शिक्षणाबरोबर खेळ व कुस्तीची प्रचंड आवड, कामाप्रती निष्ठा व मेहनत करण्याची इच्छाशक्ती, चिंतनशील वृत्ती, दांडगे वाचन, गुणग्राहकता इत्यादी वैशिष्ट्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरले आणि प्रशासनात विविध पदांवरून कार्यशैलीचा प्रत्यय त्यांनी दिला आहे.जनमानसांच्या कामकाजाची अचूक चाहूल ओळखत, सामाजिक समस्यांचे निराकरण, सरकारी धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी, जनता व शासनातील संवादाचा दुवा, लोकांच्या आशा-आकांक्षा, गरज, पारिवारिक जबाबदारी अतिशय कौशल्याने हाताळत महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय व सनदी सेवेत त्यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे.
डोंगरी पोलिस स्टेशन उपनिरीक्षक, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, विशेष भूमिसंपादन अधिकारी सांगली, प्रांताधिकारी गडहिंग्लज, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे, नामदार शिवाजीराव नाईक यांचे खासगी सचिव, नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे दीर्घकाळ विश्वासू सहकारी व खासगी सचिव, या पदांवरील कार्य व्यापक राष्ट्रीय हिताचा दृष्टिकोन दिसून येतो.जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, महासंचालक मेढा प्रकल्प महाराष्ट्र राज्य, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य या पदांवरून जनता व शासकीय सेवेशी त्यांचा संवादी सूर तयार झाला आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीने जनतेचे अफाट नेटवर्क, शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचा संपर्क, चिंतनशील वृत्ती, याव्दारे माननीय साहेबांनी विविध खात्यांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. सेवेतील 22 वर्षे मुंबई, 4 वर्षे कोल्हापूर, 7 वर्षे पुणे, 1 वर्ष नाशिक, 3 वर्ष सांगली, अशी एकूण 36 वर्षे 5 महिने सेवा म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर आढावा होय.स्वकर्तृत्वाने प्रशासनात आपले स्थान निर्माण करणारे उमाप साहेब व्यवस्थापनात मजबूत पकड ठेवणारे यशस्वी अधिकारी आहेत, याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीद्वारे जाणवतो.
भान ठेवून योजना आखणे आणि बेभान होऊन त्यांची अंमलबजावणी करणे, ही वृत्ती त्यांच्या हाडीमासी रुजलेली आहे.आमच्या जातेगाव बुद्रुक येथील विविध विकासकामांचा याबाबत आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘एकात्मिक ग्रामविकास’ हे ध्येय नजरेसमोर ठेवत गावांतील लोकनेतृत्व प्रकाशबापू पवार, सदाशिव पवार यांच्या सहकार्याने तसेच ध्येयवादी सहकारी दत्ताअण्णा उमाप, हनुमंतराव क्षीरसागर, रमेश फणसे, सुरेश मोरे, महादू क्षीरसागर, साहेबराव उमाप यांच्या मदतीने ‘श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना सन 1997 रोजी केली. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रमुख माध्यम म्हणून श्री संभाजीराजे विद्या संकुलाचा विस्तार केला आहे.
या कार्यासाठी प्रकाशबापू पवार यांनी संस्थेला अर्धा एकर शेतजमीन देणगीरूपाने दिली. संस्थेने शासन व स्थानिक स्तरावर निधी जमा करीत 3 एकर क्षेत्रांत आज माध्यमिक, उच्च माध्यमिक विभाग व वरिष्ठ महाविद्यालय शासन परवानगीसह सुरू केले आहे. या संकुलात आजमितीस 1840 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, हा सुध्दा उमाप साहेबांच्या कल्पक व दूरदृष्टीचा प्रत्यय आहे. स्व. रामभाऊ इंगवले, स्व. बापूसाहेब इंगवले, स्व. बाबासाहेब पवार या समाजसेवकांनी हा वटवृक्ष बहरणेकामी मोलाची मदत केली आहे.
ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्यात साहेबांचे योगदान लक्षणीय आहे. मुलींची शैक्षणिक गैरसोय दूर झाली आहे. परिसरातील शिरूर, आंबेगाव, श्रीगोंदा, पारनेर, हवेली, पुणे या भागांतून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. याचे श्रेय माननीय उमाप साहेब यांना निश्चितच द्यावे लागेल.गुणवत्ता आणि मूल्यांची कदर करणारा हा अधिकारी म्हणजे समाजहिताची दृष्टी आणि व्यापक जनसामर्थ्य लाभलेला प्रशासकीय आविष्कार आहे. सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने तमाम जातेगाव बु. ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना उत्तम आरोग्य व सर्वोत्तम जीवन वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो.