(प्रतिनिधी : कैलास गायकवाड)
लोणी I झुंज न्यूज : येथील डोंगराभाग शिवडी वस्तीच्या रानात गुरुवार (दिः१०) रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब वाळूंज यांच्या रानात चरत असणाऱ्या जर्शी गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्यामूळे वाळूंज यांना जवळ-जवळ एक लाख रुपये किंमतीचा फटका बसला.
वाळूंज नेहमी प्रमाणे आपल्या गायी रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते. दिवसभर गाई चरल्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ते गाईना घरी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच धबा धरून बसलेल्या बिबट्याने गाईवर हल्ला करून गाईला ठार केले. गाई का ओरडली म्हणून वाळूंज हे धावत गाईच्या दिशेने आले तर बिबट्याने गाईवर हल्ला केलेला दिसला. त्यांनी आरडा ओरड केली तोपर्यंत बिबट्याच्या हल्यात गाई मृत्युमुखी पडली होती.
या संदर्भात योगेश वाळूंज यांनी वनविभागाला कळविले व लागलीच वनपाल साईमाला गिते, वनमजूर बाळासाहेब लंके, यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी माझी सरपंच सावळेराम नाईक, माऊली क्षिरसागर, ज्योती लंके, जगन लंके, कैलास लंके यानीही घटनास्थळी भेट दिली. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.
वाळुंजनगर, वडगावपीर व लोणी असे सलग तीन दिवस बिबट्याने शेळी व गाईवर हल्ला केल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी माजी सरपंच सावळेराम नाईक यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वनविभागाने वाढत्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे नाईक यांनी सांगितले.