पुणे | झुंज न्यूज : मराठी लेखक, संशोधक, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सायंकाळी घरी पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी केलेल्या 2100 व्या भारुडाचा कार्यक्रम 14 मे 2019 रोजी झाला होता. रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. 34 वर्षांच्या नोकरीनंतर ते 2014 मध्ये निवृत्त झाले.
रामचंद्र अनंत देखणे हे शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील भूमिपुत्र होते. (जन्म : एप्रिल १९५६) यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.
रामचंद्र देखणे हे जरी भारुडांत रंगून जात पण त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली.
’भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान – संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास इ.स. 1985 मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचा 10 हजार रुपयांचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
विविध विषयांवर व्याख्याने
डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी भारुडाचे कार्यक्रम केले. त्यांच्या २१०० व्या भारुडाचा कार्यक्रम १४ मे २०१६ रोजी झाला होता.
संत साहित्यावर विपुल लेखन
संत साहित्यावर डॉ. देखणे यांनी विपुल लेखन केले. ‘अंगणातील विद्यापीठ’, ‘आनंद तरंग’, ‘आनंदाचे डोही’, ‘आषाढी’, ‘भारुड आणि लोकशिक्षण’, ‘दिंडी’, ‘तुका झालासे कळस’, ‘तुका म्हणे जागा हिता’,’ महाकवी’ अशी डॉ. देखणे यांची ३८ ललित, संशोधनपर आणि चिंतनात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
विविध पुरस्कारांनी सन्मान
पुणे सार्वजनिक सभेतर्फे ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार (२०१२), छत्रपती सेवा प्रतिष्ठानकडून जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार (३-६-२०१७), लेवा पाटीदार मित्र मंडळातर्फे बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न पुरस्कार (७-१२-२०१४) अशा विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. कडोली साहित्य संमेलन, आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनासह विविध संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.