हास्याचा मळा – विनोदी कथासंग्रह (परिचय कर्ता : प्रा कुंडलिक कदम )

पुस्तकाचे नाव : हास्याचा मळा/ विनोदी कथासंग्रह
संपादक : सु. ल. खुटवड
प्रकाशक : शंतनु पब्लिकेशन पुणे
आवृत्ती : प्रथम नोव्हेंबर २०१५
पाने : १७६
किंमत : दोनशे रुपये
परिचय कर्ता : प्रा कुंडलिक कदम
तळेगाव ढमढेरे. तालुका. शिरूर. पुणे
——————————-
हास्याचा मळा हा प्रसिध्द विनोदी लेखक सु. ल. खुटवड यांनी संपादित केलेल्या विनोदी कथांचा संग्रह आहे. दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात दर शनिवारी गुदगुल्या नावाचे सदर प्रकाशित होत असे. यामध्ये नावाजलेल्या लेखक आणि नवोदित लेखक कथा लिहित असत. सु. ल. खुटवड त्या पुरवणीचे काम पाहत होते. त्या पुरवणीमुळे अनेक नवीन लोकांना लिखाणाची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यात नवोदित लेखकांची एक नवी फळी तयार झाली. अनेकांना अगदी आपली पहिलीच कथा या पुरवणीत लिहण्याची संधी मिळाली. आपण लिहालेल्या कथेला सकाळ सारख्या नामांकित पेपरमध्ये छापण्याची संधी मिळाल्याने अनेकांना लिखाणाची ऊर्मी मिळाली आणि अनेक हात लिहते झाले.

सु. ल यांच्या कल्पनेतून या सर्व लेखकांचा एक प्रातिनिधिक कथासंग्रह प्रकाशित करण्यात आला. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व लेखकांचा स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होता.

यात ५८ विनोदी कथांचा समावेश आहे. नवोदित लेखक यांच्याबरोबर नामांकित लेखक यांच्या कथा या कथासंग्रहात आहेत. समाजातील अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लेखकांच्या कथा या कथासंग्रहात आहेत. त्यामुळे यामध्ये विविधता आहे. यात महिला लेखकांची संख्या चांगली आहे. तसेच बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याची कथा यात आहे. विजय कापडी यांची वादाची नशा, वसंत मिरासदार यांची सहस्त्रचंद्रदर्षण, ग्रामीण विनोदी सुप्रसिध्द लेखक व. बा. बोधे यांची पाचार कथा, सु. ल . यांची कधी होणार लग्न माझे ही कथा, आयाती शिकार ही सुरेश पोरे यांची कथा वाचायला मिळते.

ग्रामीण भागात अनेक इरसाल पात्र असतात. बेरकी माणसं असतात. अनेक तऱ्हेवाईक लोक असतात. यांच्या वागण्या बोलण्यातून अनेकवेळा विनोदाची निर्मिती होत असते. ही अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदनिर्मिती आपणाला या कथासंग्रहात वाचायचा मिळते. ग्रामीण बोलीची वेगवेगळे रंग अनेक कथांमध्ये वाचायचा मिळतात. यातली कथांच्या माध्यमातून ग्रामीण बोली भाषा आणि संस्कृती याच दर्शन घडते.

पूर्ण जिल्ह्यातून या पुरवणीसाठी लेख येत होते. त्यातून काही निवडक कथांचा हा संग्रह आहे. यामधील कथांसाठी प्रसिद्ध चित्रकार खालिल खान यांनी चित्र रेखाटली आहेत.

कथा अगदी दोन ते तीन पांनाची असल्याने अगदी सहजपणे वाचली जाते. प्रत्येक कथेत विनोद निर्मिती असल्याने वाचकाच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्य उमटते. वाचतांना वाचक एक कथा वाचली की त्याला त्यापुढची कथा वाचण्याचा मोह होतो. त्यामूळे एका बैठकीत हे पुस्तक वाचून होते. विनोदी साहित्यात या पुस्तकाचं वेगळं स्थान आहे.

नवीन विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांना हे पुस्तक मार्गदर्शक आहे .धकाधकीच्या जीवनात माणसाच्या चेहऱ्यावरील हसू कमी होत आहे. जीवनातील ताण तणाव वाढत आहे. हे पुस्तक वाचून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईलच आणि तणाव कमी होण्यास नक्की मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *