नवी दिल्ली I झुंज न्यूज : राजधानी दिल्लीत आज मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला आहे. एका आजारी व्यक्तीला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती ३१ वर्षांची असून त्या व्यक्तीचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. ताप आणि अंगात फोड आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतात मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गाची ही चौथी घटना आहे. संक्रमित व्यक्तीचा प्रवासाचा इतिहास नसलेली ही पहिलीच घटना आहे. यापूर्वीच्या तिन्ही प्रकरणांमध्ये, संक्रमित लोक नुकतेच परदेशी प्रवासावरून परतले होते.
केरळमधील कन्नूर येथे 14 जुलै रोजी मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर 22 जुलैपर्यंत एकूण तीन रुग्णांची नोंद झाली. यातील दोन लोक यूएईमधून परतले होते, तर एक जण थायलंडमधून आला होता.
गेल्या दोन वर्षांत जगभरातील बहुतेक देशांमध्ये, कोरोनाव्हायरस संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अनेक देश अजूनही या विषाणूपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यात्याच आता मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनानंतर मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ जागतिक आरोग्य संघटना आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जास्त आहेत. त्यातच भारतातही तीन रुग्ण आढळले आहे.
“मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाच देशांमध्ये सर्वाधिक पसरला आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक 3125 लोक आहेत. यानंतर अमेरिकेत 2890, जर्मनीमध्ये 2268, ब्रिटनमध्ये 2208 आणि फ्रान्समध्ये 1567 रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा व्हायरस आहे. जगभरात आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे.