मुंबई I झुंज न्यूज : उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होणाऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद निर्माण होत असतो. या वादाला राजकीय फोडणी देऊन तो अजूनच जास्त प्रभावी करण्यात आला आहे. त्यातच आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या पत्रामुळे आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशतल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. मात्र, हे पत्र मराठीच्या प्रेमामुळे नव्हे तर उत्तर प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सोपं जावं यासाठी मराठी शिकवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येत असलेल्या कामगार, मनुष्यबळामुळे राज्यातील रोजगारांच्या संधी मर्यादित होत असल्याचा दावा केला जातो. त्यातच कमी वेतनात स्थलांतरीत कामगार काम करत असल्याने स्थानिकांना कामाचा योग्य मोबदलाही मिळत नसल्याचा आक्षेप घेण्यात येतो. त्यातच आता कृपाशंकर सिंह यांच्या पत्राने नवा वाद उभा राहणार आहे.
कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मराठी विषय पर्यायी म्हणून शिकवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी आल्यास त्यांना महाराष्ट्रात चांगली नोकरी उपलब्ध होऊ शकेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी कृपाशंकर सिंह यांनी केली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर उत्तर प्रदेश सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रायोगिक तत्वावर हा वाराणसीमध्ये मराठी विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी लिहिलेल्या पत्राचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात थंड पडलेला भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय असा नवा वादही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेवरही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.