माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं… ; ‘त्या’ भोजपुरी गाण्यातून राज ठाकरेंना आव्हान, सोशल मीडियावर धुमाकूळ

पुणे I झुंज न्यूज : राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेतून सुरु केलेल्या या इनिंगनंतर ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये झालेल्या सभा आणि कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी अस्मितेचा मुद्दा बाजुला सारत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृज भुषण सिंह वारंवार आव्हान देत आहेत. यावरुनच आता एक भोजपुरी गाणं देखील तयार करण्यात आलंय. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु केली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. केवळ इशारा देऊन बृजभूषण थांबलेले नाहीत तर त्यांनी नंदिनी येथे साधुसंत आणि नागरिकांसोबत बैठकीचं आयोजन करुन स्थानिकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. एकीकडे प्रत्यक्षामध्ये राज यांना विरोध केला जात असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी समाज माध्यमांवरही बृजभूषण शरद सिंह यांच्या समर्थकांनी मोहीम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी एक गाणंही तयार केलंय.

माफी मांगो राज ठाकरे असं या गाण्याचं नाव असून उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्तरावरील चित्रपटांसाठी ज्या पद्धतीने उडत्या चालीवर गाणी रचली जातात तशीच या गाण्याची चाल आहे. महेश निर्मोही यांनी या गाण्याला आवाज दिला असून गाण्याचे बोल कवि योगेश दास शास्त्री यांचे आहेत. गाण्याला संगीत बब्बन आणि विष्णू यांनी दिलं आहे. “कदम नही रखने देंगे ये नेताजीने ठाणा हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं,” असे या गाण्याचे बोल आहेत, या गाण्याची एक क्लिप सध्या व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.

“राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता भोजपुरी गाण्यातून सुद्धा आव्हान देण्यात आलं आहे. भाजप खासदार बृज भुषण सिंहांनी दिलेल्या आव्हानंतर आता या गाण्यातून देखील त्यांना आव्हान देण्यात आलं आहे. तर तिकडे बृज भुषण सिंह यांनी आता ‘राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही’ असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *