लेखन : संजीव वेलणकर, पुणे
मोबा : ९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
आजपासून प्रेमी युगुलांच्या ‘वेलेटाइन डे’ सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला. जगातील तरूणाईत आज पासून आठवडाभर गुलाबी रंगाची उधळण होईल. उमलत्या वयातील कोवळ्या, तरल भावना गडद लाल रंगाच्या पाकळ्यांतून आणि सुगंधातून पोहोचवण्याचा प्रयत्न तरुणाई करेल आणि गुलाब पुष्पांची देवघेव होईल. या आठवड्यापासून वेलेंटाईन डे पर्यंत विविध मार्गांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ भावना व्यक्त करण्यात येतात.
जस जसा वेलेंटाइन डे जवळ येतो तसा तरूणाच्या उत्साहाला उधाण येते. विशेषतः रोझ डे पासून तरूणाईकडून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी विविध भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आढळून येते. या पार्श्वभूमीवर आज रोझ डे असल्याने बाजारपेठाही विविध भेट वस्तू, ग्रिटींग कार्ड आणि लाल रंगांच्या आकर्षक गुलाबाने सजल्या आहेत. यामध्ये टेडी बियर आणि लव्ह बर्डच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
तरूण-तरूणींकडून सर्वप्रथम लाल रंगाच्या गुलाबाचीच मागणी केली जाते. त्यानंतर भेट वस्तुंची खरेदी. टेडी बियरला सुद्धा तरूणांकडून मोठी पसंती मिळत असते. वेलेंटाइन डे चा हा आठवडा केवळ प्रेमी युगुलांसाठीच असतो असे नाही. तर या कालावधीत प्रत्येक तरूण किंवा तरूणी आपल्या आई-वडिल, भाऊ-बहिण आणि शिक्षकांच्या प्रती आदरयुक्त प्रेम व्यक्त करू शकतात. तसेच त्यांना भेट वस्तु देऊ शकतात.
प्रत्येक दिवसाचे एक वैशिष्ट्य अधोरेखित करत प्रेम संदेशांची देवाणघेवाण गुलाबपुष्पांच्या साक्षीने केली जाते. त्यामुळे या काळात लाल गुलाबांना सर्वाधिक मागणी असते आणि त्याला सर्वाधिक भावही मिळतो.
आपल्या राज्यातील गुलाबांना हॉलंड, नेदरलँडसह देशभरात मागणी आहे. व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने फक्त गुलाबपुष्पांची तब्बल सहा ते आठ कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असते.