मुळशी | झुंज न्यूज : नेरे, ता.मुळशी येथे बिबट्याची तीन पिल्लं सापडली आहेत. तीन पिल्लं सापडल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी लागलीच तिकडे धाव घेतली. वनविभागाला संबंधित घटना कळल्यानंतर त्यांनी देखील लागलीच त्या ठिकाणी जाऊन तिन्ही पिल्लांना ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी नेरे-दत्तवाडी येथे सीताई बंधाऱ्याजवळील गुलाब जाधव यांच्या शेतात ऊसतोडणी चालू असताना ही पिल्लं आढळून आली. केवळ १५ दिवसाचे वय असलेली ही तीनही पिल्लं मादी असून त्यांना योग्यरीत्या ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच त्यांना पुन्हा संध्याकाळी येथे सोडून देण्यात येणार आहे. वय लहान असल्याने त्यांच्या मातेची भेट घडणे अतिशय गरजेचे असल्याने हे पाऊल उचलणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.
परिसरात बिबट्याचा वावर अनेक वर्षांपासून असून आजपर्यंत कुठेही मनुष्यावर हल्ला झालेला नाही. तथापि ग्रामस्थं भयभीत असून खबरदारी घेण्याची गरज आहे. वनविभागाने देखील याची दक्षता घेऊन कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.