शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शुभेच्छांचा वर्षाव ; पवारांनी सोशल मीडियावरुन मानले आभार…

मुंबई | झुंज न्यूज : राज्य आणि देशपातळीवरील प्रमुख नेत्यांपैकी एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस (Birthday). या निमित्त सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेत्यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Post) सर्वांचे आभार मानले आहेत.

‘आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे’, असं पवार म्हणाले.

“आज खऱ्या अर्थाने काही गोष्टींच्या संदर्भातील निकाल आपल्याला घ्यावा लागेल. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य आहे.

आज असंख्य प्रश्न देश आणि सामान्य लोकांसमोर आहेत. त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रभावी नीतीने काम करणारा पक्ष आणि कार्यकर्ता कोणता, हा प्रश्न समोर आला असता लोकांनी आपल्याच पक्षाचे नाव घ्यावे अशा पद्धतीने पक्षाची बांधणी करावी लागेल’, असं पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *