खळबळ ! सीडीएस बिपीन रावतांचे हेलिकॉप्टर कोसळले, आगीचे लोट उसळले ; महाभयंकर अपघात कसा घडला, वाचा सविस्तर…

चेन्नई I झुंज न्यूज : तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले. कित्येक दूरवरून लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.

असा झाला अपघात?

सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली.

तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. हेलिकॉप्टरमध्ये रावत, रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आएएफ पायलट यांचा समावेश आहे.

झाडांनाही लागली आग

कुन्नूरच्या घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की, खूप दूरवरून आगीचे लोळ दिसले. त्यामुळे परिसरातील नागरिक, पोलीस, लष्कराचे जवान आणि हवाई दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथले चित्र भीषण होते. अनेकजण आगीत होरपळत होते. मृतदेह खाक झालेले.

हेलिकॉप्टर इतक्या वेगाने कोसळले की उभी झाडेही कापली गेली. हिरव्यागार झाडांना आग लागली. घटनास्थळावर बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू केली आहे. दोन मृतदेह ८० टक्के जळालेल्या स्थितीत आढळून आले आहेत. आणखी काही मृतदेह जंगलात दुर्घटनाग्रस्त भागात आढळल्याचे बोलले जात आहे. इतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.

चौकशीचे आदेश

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *