पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांनी २६ हजारांचा टप्पा पार केला असून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोविड रुग्णांवर प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीरची इंजेक्शन्स पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे सुपूर्द केली आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी ५० इंजेक्शन्स पाठवली आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी इंजेक्शन्स पाठवली जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी हे इंजेक्शन्स महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंडे वाबळे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. संबंधित इंजेक्शन्स हे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरिबांसाठी दिली असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. करोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे करोना बाधितांची संख्या इपाट्याने वाढत आहे. मनपा प्रशासन करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करीत आहे. करोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभाशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या ठिकाणी रेमडेसिवर इंजेक्शन्स देण्यात आली आहेत.
यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयातील करोनाबाधित गोरगरीब नागरीकांसाठी आज पन्नास इंजेक्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिली.अजूनही सदरची इंजेक्शन देणार आहेत. असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.